आई एकविरा

कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र किर्ती मिळवली, म्हणुन एका विर पुत्राची आई म्हणंजेच एकविरा माता होय. ‘एकवीरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी सह्याद्रिखंडता असा उल्लेख सापडतो कि शंकरानेच आईला एकविरा हे नाव देउन ठेवले आहे. आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभु असुन अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती स्वयंभु तांदळा दगडात प्रगटलेली “शेन्दुंर चर्चीत” आहे. आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले आहेत. आईचे रुप प्रसन्नकारी आहे. एकविरा देवी ही जलदेवता म्हणुन प्रसिध्द आहे. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद  “जोगेश्वरी देवीची“ शेन्दुंर चर्चीत मुर्ती आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सावाच्या यात्रा होतात. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारेप्रभु, चौकळशी, पाचकळशी, क्षात्रीय, वैश्य इ. समाजाची आई एकविरा कुलस्वामीनी आहे. त्यामुळे ठाणे, मुबई, रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते. विशेषकरून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात. जगभरातुन भाविक आईच्या दर्शनाला येतात. दिवसेंदिवस एकविरेच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे. आईच्या मंदिरा शेजारी “ प्राचीन बौध्द इतिहासप्रसिध्द कार्ला लेणी“ आहेत. येथील शिल्प चैत्यगृह, बौध्दशिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुंफा, सभा मंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्ठकाम, भित्तीचित्रे, शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिध्द आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. इंद्रायणी नदी, विसापूर, लोहगड, तुगं हे नयनरम्य गड किल्ले कार्ला गडावर चढताना दृष्टीस पडतात. श्री एकविरा देवी विश्वस्त संस्थानच्या वतीने प्राथमिक सेवासुविधा पुरवित गडावर अनेक सुधारणा केल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत तरे यांच्या अथक प्रयत्नांनी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची, विजेची, राहण्याची, रस्त्यांची, प्रसादाची व दर्शनाची योग्य काळजी घेतली जाते. गडावर लवकरच रोप-वेची सुविधा ही सुरू  होणार आहे. आई एकविरेच्या भक्तांसाठी सदैव तत्पर असलेले श्री एकविरा देवी विश्वस्त संस्था प्रामाणिकपणे आईची सेवा समजून अहोरात्र भक्तांसाठी काम करत असते. संस्थेच्या वतीने गडावर यात्रा, पालखी, होमहवन, जागरण, गोंधळ, भजन, किर्तन, व्याख्याने असे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. आईच्या जगभरातील भाविकांसाठी विश्वदर्शन आईची वेबसाईट बनवली आहे. त्यामुळे आईचे दर्शन अर्थात विश्वदर्शन झाले आहे. जगातून कुठूनही आईचं दर्शन घेणं आता सोप्प झालं आहे. आई एकविरेच्या सर्व भक्तांना उदंड आयुष्य लाभो हीच एकविरेचरणी प्रार्थना! सदानंदाचा उदो उदो! आदिमाउलीचा उदो उदो!! आई एकविरेचा उदो उदो!! जय एकविरा!