आख्यायिका

एकविरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी|      
अदितीर्यामदंबा सा संभविष्याति भूतले ||
जनिष्यामि संदेह: पंचपुत्रान्मनोरथान् |

सह्यद्रीखंडात एकविरा  देवीबद्दल असा उल्लेख आढळतो. आदितिने तपकेल्यावर शंकरानी तिला वर दिला की तुझा भूतलावर अवतार ईक्षाकू वंशातील घरी होईल. त्यावेळी तूझे मूळ नाव “रेणूका” असेल परंतु भूतलावर मात्र तू  “एकविरा” या नावाने विख्यात होशील, तसेच तुला पाच पुत्र होतील म्हणुन या श्लोकाआधारे असे म्हणता येईल की, या देवीला एकविरा हे नाव साक्षात शंकरानीच ठेवले असावे,   तसेच कदाचित एका वीर पुत्राची आई म्हणुनही एकविरा  असे नाव ठेवण्यात आले असावे, आई एकविरेच्या नावाबद्दल दुसरी एक अख्यायिका अशी आहे – द्राविडीयन लोकांची रेणूका ही अतिप्रिय देवता असून तिचे नाव “अक्का अत्वैचर” असे आहे या शब्दाचा ते “पूजनीय” माता असा अर्थ करतात. तेव्हा या नावापासून ही “एकविरा” हा अपभ्रंश संभवतो तसेच (कर्नाटकात रेणूकेची पूजा “यल्लमा” किंवा “यमाई” या ही नावाने होते ) दक्षिण प्रांती या देवतेला आतिशय महत्व आहे, भारतात तसेच कर्नाटक या दोन्ही प्रदेशात एकविरेची पूजा सर्वत्र केली जाते,  पुराणांच्या  आधारे विष्णुने पृथ्वी तलावर १० अवतार घेतले १) मत्स्य, २) कुर्म, ३) वराह, ४) नरसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण,  ९) बुध्द व १०) काली. एकविरा देवी परशुरामाची आई रेणूका. परशुरामाचा अवतार सहावा. त्याच्या कालखंडात त्याने सह्याद्री पर्वतात दिव्य बाण मारून एकवीरा देविची स्थापना केली आणि जी बौध्द लेणी भगवान बुध्दांच्या  पुण्य प्रभावातून निर्माण झाली तो बौध्द अवतार अर्थात विष्णूचा अवतार ९ वा आहे. यावरून एकविरा स्थान व कार्ला लेणी यात राम व कृष्णा या दोन विष्णू अवतारांचा फरक आहे. म्हणजे कार्ला येथील बौध्द लेण्यापेक्षा कार्ला येथील एकविरा देवीचे स्वयंभू स्थान हे प्राचीन आहे.

आई एकविरा संत एकनाथांची कुलदेवता होती
“श्रेष्ठ खाणी कुलदेवता, जे का एकविरा एकनाथा|
जगी मीरवली एकात्मता | हे कुलदेवता एकनाथाची”||

(एकनाथी भागवताच्या आरंभी १.७०-७३ ओव्यांत कुलदेवतेस संत एकनाथांनी   नमन केले आहे)

ते शिवशक्तिरूपे दोनी | नेऊन मिरवे एकपणी।
एकपणे जाली गुर्विणी | प्रसवे एकपणी एकविरा।।
 ते एकरूपे एकविरा | प्रसवली बोध फरशधरा।
 जयाचा का दरारा  | महावीरां अभिमानियां।।   
 तेणे उपजोनि निवटिली माया| आज्ञा पाळूनि सूख दे पितया || 
म्हणोनी जो जाहला विजया| लवलाह्यां दिग्मंडळी 
जो वासना सहस्त्रबाहो |छेदिला सहस्त्रार्जुन अंहभावी|          
स्वराज्य करूनियां पाहा हो |अर्पी स्वयमेवो स्वजातियां||

 (एकनाथी भागवत १.७०-७३)

एकविरा आईचे थोर भक्त विष्णुदास यांनी माझी रेणूका माउली, कल्पवृक्षांची सावली या शब्दात एकविरेचे वर्णन केले आहे, आईएकविरेची अख्यायिका सागांयची झाली तर आईची मूर्ती ही स्वयंभू (तांदळा) दगडात प्रगटलेली शेन्दूंर चर्चीत आहे एकविरा देवी ही जलदेवता म्हणून प्रसिध्द आहे. जलदेवता म्हणजे ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबध येतो. कोळी, आगरी या लोकांना आईची नेहमीच प्रचिती येते कारण ह्या लोकांचा व्यावसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबधीत आहे. म्हणूनच कोळी आगरी व कुणबी, सोनार, पाठारेप्रभू, चांद्रसेनिस कायस्त प्रभु, चौकळशी-पाचकळशी प्रभु या समाजात ही आईची प्रचीती भक्तानां वारंवार येते, त्यामूळेच या समाजाने आईएकविरेला कुलदैवत मानलं आहे. आई एकवीरा क्षत्रीय, वैश्य, शुद्र समाजाची कुलदैवता असल्याकारणाने ती अति प्राचीन देवता असावी असा इतिहास  संशोधकांचे मत आहे.

ज्या वेळी देवता दुष्टांचा नाश करते, त्या वेळी नीश निर्देशक म्हणून ती मूर्ती काळ्या पाषाणाची घडवतात. परंतु जेव्हा एखादी देवता भक्तांच्या संरक्षणासाठी, पालनासाठी वा शुभकार्य करते, तेव्हा ती मूर्ती शुभ्र पाषाणाची घडवतात. एकविरा आईची मीर्ती (तांदळा) दगडावर कोरलेली असून शेंदूर चर्चीत आहे. आईचे नेत्र हे मिन्यापासून बनवले आहेत, आईचा चेहरा प्रसन्नकारी आहे, सकाळी आईचा अभिषेक झाल्यावर आईला सुवर्ण मुखवटा चढवला जातो. आईला चोळी, पातळ नेसवून आईचे सर्व दागिणे आईला घातले जातात. आईच्या नाकातली नथ खूपच उढावदार वाटते. त्यामुळे आईचे ते रूप अतिशय प्रसन्नकारी वाटते. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद जोगेश्र्वरी देवीची शेंदुरचर्चित मूर्ती आहे. जग भरातून रोज लाखो भक्त आईच्या दर्शनाला येतात. नवसाला पावणारी आई आशी भक्तांची श्रध्दा आहे. त्यामूळे नवस करणाऱ्यांची व नवस फेडणाऱ्यांची इथे रोजच गर्दी असते. नवस करणारे लोक दागिणे,  मुखवटा, देणगी, ओटी, अन्नदान किंवा इतर प्रकारे आपला नवस आपापल्या परीने फेडतात. इथे देवीला कोंबडा किवा बकरा बळी देण्याची प्रथा आहे. आईचा कुंकू मंदीराच्या बाहेर कोंबडी-बकऱ्यांना लावून डोगराच्या पायथ्याशी त्यांचा बळी दिला जातो. महत्वाचं म्हणजे येथे देवीला प्रदक्षिणा घालता येत नाही कारण आईची मूर्ती डोंगरात खोदलेली आहे. सुट्टीच्या दिवसात गडावर आईचे दर्शन घेण्यासाठी भाविक खुप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.