विधी आणि दिनचर्या

एकविरा आईचे मंदीर दररोज पहाटे ५ ला उघडले जाते मंदीरात गुलाबजल, अत्तर, गोमूत्र शिंपडून स्वच्छ पवित्र वातावरण निर्माण केले जाते. तांदळा दगडात कोरलेली शेंदूर चर्चित आई एकविरेच्या मुळ मुर्तीची पहाटे ५.३०ला काकड आरती केली जाते, ६ वाजून ३० मिनीटांनी अभिषेकाला सुरुवात होते. सुरुवातीला आईच्या डाव्या बाजूस असलेल्या जोगेश्वरी देवी (आईची नणंद) हिचा यथोचित अभिषेक केला जातो, मंदीरात सर्वत्र उदबत्ती-धूपाचा सुगंध पसरतो घंटीचा नाजुक स्वर आणि सडोपचार एकविरा आईच्या मंत्राचा जप अशा मंगळमय प्रसन्नमय वातावरणात आई एकविरेच्या अभिषेकाला सुरवात होते आईला पंचामृताने सडोपचाराने अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यावर आईला नविन वस्त्रे परिधान केली जातात, मग आईला सुवर्ण मुखवटा चढवला जातो त्यानंतर आईला सुवर्ण अलंकाराने मढवलं जातं. फुलानीं आईला सजवल जात सुगंधी चाफ्याच्या फूलांचा हार  देवीला घातला जातो. मोगरा-आबोलीच्या फूलाचीं आईला वेणी घातली जाते. आईचं साजशृंगार झाल्यावर आईची आरती केली जाते, आईचे सर्वविधी हे ब्राम्हणांच्या हस्ते होतात, आईचं ते प्रसन्न रुप पाहुन मन अगदी उल्हासित होतं. मनात नविन चैतन्यं निर्माण होतं आलेल्या भाविकाचं नाव व गोत्र यांचा संकल्प सोडला जातो. कुणा भक्ताला स्वहस्ते अभिषेक करावयाचा असल्यास देवस्थानच्या माध्यमातूनं रु. १००० (एक हजार रूपये)ची पावती फाडून भाविक स्वहस्ते अभिषेक करू शकतात. सकाळी ६ वाजल्या पासूनच आईच्या दर्शनाला सुरुवात होते. आईला १ वाजता महाप्रसाद नैवेद्य दाखवलं जातं. सायंकाळी ७ वाजता देवीची यथोचीत आरती केली जाते. नंतर आईचा मुखवटा उतरवला जातो आणि मंदीर बंद केले जाते.                                           

सकाळचे सर्वविधी प्रथे-परंपरेप्रमाणे ब्राम्हणांच्या हस्ते होतात, देवीच्या गाभाऱ्याची देखभाल, देवीची ओटी भरणे, भाविकांनी आणलेली हार-फुलं भेटवस्तु देवीपर्यंत पोहचविण्याचं काम तेथील स्थानिक गुरव मंडळी करतात ही परंपरा फार पूर्वीपासून सूरु आहे.