अध्यक्षांचे मनोगत

जगत् जननी एकवीरा आईचे देवस्थान कार्ल्याच्या डोंगरावर स्थित असल्याने एकवीरा आईच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही वयोगटातील भाविकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा आणि मन:शांतीकरिता आलेल्या या भाविकाला मंगलमय वातावरणात आईचे सहज-सुलभ मार्गाने दर्शन व्हावे, यासाठी सचोटीने प्रयत्न करणे हे विश्वस्त मंडळाचे आद्य कर्तव्य आहे. विश्वस्त मंडळाने आजपर्यत गडपरिसरात विविध उपक्रम भक्त व भाविकांकरीता राबविले आहेत. त्यापैकी नुकतीच गडावर २० खोल्यांचे भक्तधाम सुमारे १ कोटी रूपये खर्च करून बांधले आहेत. आंघोळीकरिता गरमपाणी, स्वतंत्र व स्वच्छ शौचालय आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. गडावर व वाहनतळाजवळ दोन मोठे हायमास्ट सुरु करण्यात आले आहेत. कार्ला फाटा ते गड पायथ्यापर्यंतच्या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण होणार आहे.  

आईच्या दर्शनासाठी येणारे अपंगांकरीता गडावर लवकरच रोप-वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिर्डी संस्थानाप्रमाणेच देवीच्या असंख्य देवीचा प्रसाद म्हणून लाडू व कुंकूंचा प्रसाद देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसेच दर मंगळवारी येणाऱ्या भाविकांकरीता अन्नदान विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नाने सुरु होणार आहे. देवीच्या वर्षभरातील कार्यक्रमांपैकी सप्तमी अष्टमीमधील चैत्र यात्रा व पालखी सोहळा नवरात्रौत्सवमधील महानवमीचा कार्यक्रम याच बरोबर सहस्त्रचंडी होमहवन कार्यक्रमाला सुप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांचे जागरण, गोंधळ, भजन, किर्तन, व्याख्याने असे विविध कार्यक्रम विश्वस्त मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येतात.

सध्याच्या स्थितीत गडपायथ्याला देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून व माझ्या आमदार फंडातून तसेच तत्कालीन आमदार रूपालेखा गोरे यांच्या आमदार फंडातून सूलभ शौचालय पर्यटन तीथक्षेत्र विकास निधी यांच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. तसेच वन विभागातून ४ एकर जागा घेऊन वृक्ष लावण्यात येणार आहे व त्यामुळे वनात बसून हिरव्यागार झाडाच्या सावली व गार वाऱ्याचा आनंद भक्तांना लुटता येणार आहे. सदर जागेची मागणी वन विभागाकडे विश्र्वस्त मंडळाने केली आहे. भाविक भक्तांना रांगेत सुलभ व शांततेत दर्शन घेता यावे तसेच दर्शन रांगेत उभे राहील्यावर देवीचा अभिषेक, पुजा, सकाळ-संध्याकाळची आरती क्लोज सर्किट टिव्ही (CCTV) मुळे रांगेतून भाविकांना करता येते. रांगेत ट्यूब, पंखे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १०० खोल्यांचे भक्तधाम निर्माण व्हावे हा विश्वस्त मंडळाचा पुढील संकल्प आहे. देवीचे अल्प उत्पन्नातून भक्त—भाविकांना जास्तीत जास्त सुखसोई पुरविण्याचा विश्वस्त मंडळ गेले १० ते १५ वर्षे प्रयत्न करीत आहे. देवीच्या देशा-विदेशातील असंख्य भाविकांना घरबसल्या देवीची सकाळची पुजा, अभिषेक, आरती, विविध धार्मिक कार्यक्रम, विश्वस्त संस्थानाच्या पुढील संकल्प, गडावर केलेल्या सोई-सुविधा आदी आपण या वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकणार आहात. सदर वेबसाईटवर देवीच्या तमाम भक्तांचे अध्यक्ष या नात्याने व विश्वस्त मंडळाच्या वतीने हार्दीक हार्दीक स्वागत!  

- अनंत तरे, अध्यक्ष