श्री कालभैरव मंदिर

श्री कालभैरव हा कार्ला येथील एकविरा आईचा भाऊ आहे. शिवशंकरांनी तांडवनृत्यातून त्यांच्या अदभुतशक्तीने त्यांच्या दंडापासून दिव्य श्री कालभैरव देवाची निर्मिती केली. श्री कालभैरव साक्षात श्री शंकरमहादेवाचे प्रतिक रूप आहे. श्री कालभैरव श्री शंकरदेवाचा पाचवा अवतार आहे. मार्गशिर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी हा या महाशक्तीशाली देवाचा जन्म आहे. भारतात १०८ ठिकाणी श्री पार्वतीमातेची शक्तिपीठे आहेत. त्या सर्व ठिकाणी श्री भैरवनाथाचे स्थान आहे. माता पार्वतीचा जागृत रक्षक म्हणून श्री भैरव शक्तीपीठांचे रक्षण करतो. नाथसंप्रदयात श्री भैरवाच्या पूजा उपासना जप करण्यात विशेष महत्व आहे. हा देव दृष्टांचा काळ असल्याने श्री कालभैरव अशी तयांस उपाधी लागली आहे. श्री कालभैरव रंगाने तिव्र काळा आहे. उतुंग शरीराचा हा देव महाबलशाली आहे. त्याच्या शरीरावर भस्म, कपालावर त्रिपुंड आहे. गळ्यात मुंडक्यांची माळ आहे. हा देव स्मशानवासी असुन भूत-पिशाच्यावर सत्ता गाजविणारा आहे. या देवाचे वाहन कुत्रा आहे. कोणत्याही महिन्याच्या अष्टमीपासून या देवाची उपासना सुरू करता येते. श्री कालभैरवाचे मुख्यमंदीर काशी येथे आहे. महाराष्ट्रात या देवाची मूळ गादी परांडा सोनारी, फळटण परिसरात म्हसवड, सांगली परिसरात खरसुंडी येथे आहे.

कार्लाजवळील देवघर (माहेरगाव) म्हणजेच भैरवनाथाचं ठिकाणं. आई एकविरेचा भाऊ असल्यामुळे या गावाला माहेर गाव म्हणतात. देवघर गावाच्या पूर्वेस दगडी मंदीर होते, आता याच ठिकाणी नविन मंदीर बांधण्यात आले आहे. या मंदीरात पुरातनं श्री कालभैरवाची २.५ फुट उंचीची दगडी मूर्ती आहे. बाजूला खंडोबाची ३ फुटी मुर्ती आहे. या मंदीराच्या समोर एक प्रचिन दगडी बनावटीचे तलाव आहे.

दरवर्षी चैत्र पोर्णिमेस श्री कालभैरव मंदीरातून वाजत-गाजत पालखी निघते. पालखीत कालभैरवाचा मुखवटा घेऊन खुप उंच सजवलेली काठी घेऊन नाचवत कार्ला मंदिरापर्यंत आणली जाते. मंदिरात कालभैरवाच्या मुखवट्याची व देवीची भेट घालून देतात. देवीच्या मंदिरातून एका गुप्त मार्गाने श्री एकविरा देवी देवघर गावात भावास भेटण्यास जाते आशी श्रध्दा आहे. जय कालभैरव! जय कालभैरव!!