कार्ला गड

मंबई-पुणे महामार्गावर (११० कि.मी.) लोणावल्याजवळ मळवली रेल्वे स्थानकापासून उत्तरेस पाच कि.मी. अंतरावर वाकसईजवळ कार्ला फाट्यावरून ३ कि.मी. अंतरावर कार्ला गड आहे. कार्ला फाट्यावर विश्वस्त मंडळाने बांधलेला भव्य व रेखीव प्रवेशव्दार आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये हे स्थान समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर आहे. त्यामुळे येथील वातावरण नेहमीच थंड असते. नयनरम्य निसर्ग चोहीकडे झाडे, देखण्या पर्वतरांगांचा हा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होवून जातं. डोंगराच्या पायथ्याशी कार्ला गाव वसले आहे. जवळच नजरेस एक पुरातन तलाव दिसतं. त्या तलावाच्या शेजारी ‘ विहार’ (वेहेर) गाव वसले आहे. कार्ला गडाच्या पायथ्याला पहिल्या पायरीवर उजव्या हाताला देवीचे मंदिर आहे. मंदिरात ३ फुट उंचीची देवीची मुर्ती आहे. बाजूला शंकराची पिंडी आहे. कार्ला गडावर पायऱ्यांची व्यवस्था पेशव्यांनी केली आहे. या पायऱ्यांपासून पुढे थोड्या अंतरावर डोंगर उतारावर २० फुट व्यासाची प्राचीन विहीर आहे. बाजूला एक हौद आहे. या हौदात वर्षभर पाणी असते. हे पाणी चवीला गोड आहे. हौदातलं पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. विश्वस्त मंडळाच्यावतीने डोंगराच्या परिसरात ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम येथे राबवले जातात. ट्रस्ट व वनखाते यांच्यावतीने डोंगर परिसरात अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. जेणेकरून भाविकांना सावली, गारवारा मिळेल व डोंगराची झीजही थांबेल. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून नविन रस्ता बांधला आहे. हा रस्ता डोंगराच्या मध्यापर्यंत जाऊन पोचतो. कुठलीही गाडी सहज जाऊ शकते. ट्रस्टच्या माध्यमातून तेथे भव्य पार्कींगची व्यवस्था केली आहे. त्याला लागुनच सुलभ शौचालय बांधले आहे. भक्तांना पिण्याकरीता पाणपोई बांधली आहे. डोंगरावर अपंग, अशक्त, वृध्द नागरिकांना वर जाण्यासाठी ‘ डोलीची’ (पालखी) सोय आहे. डोंगर चढताना रस्त्यात एक मंदिर लागते, या मंदिरात देवीच्या पावलांचे ठसे खडकात उमटले आहेत. या मंदिराला पाचपायरी देवस्थान ‘एकविरा देवी पादुका मंदिर’ असं म्हणतात. तेथून थोड वर गेल्यावर डाव्या हाताला लांब एक पडिक धर्मशाळा आहे ती आता वापरात नाही. पायऱ्यांना लागूनच पाच मिनीटांच्या अंतरावर एकविरा देवस्थानाच्या माध्यमातून प्रशस्थ, अद्यावत सर्व सुखसोईनी परिपूर्ण २० खोल्यांचे माँसाहेब मीनाताई ठाकरे भक्तधाम भाविकांना राहण्यासाठी बांधले आहे.  डोंगर चढून वर आल्यावर एक प्रवेशव्दार लागते. ते पुराणवस्तू खात्याचे केंद्र आहे. त्याच्यासमोर वरच्या बाजूस त्यांचेच गेस्ट हाऊस असून सध्या ते बंद आहे. पुढे आत गेल्यावर एक भल मोठ पिंपळाच झाड दिसतं. तिथून पुढे डोंगरात कोरलेल्या भव्य लेणी आकर्षित करतात. कार्ला गडाच्या कुशीत प्रकटलेल्या आई एकविरेचे मंदिर आहे. आईच्या दर्शनाने मन प्रसन्न होवून जाते. पुढे गेल्यावर नगारखान्याची इमारत लागते. इथे दररोज पहाटे काकड आरतीस दुपारच्या आरतीस व संध्याकालच्या आरतीस नगारा वाजवला झातो. सध्या विजेवर चालणारा नगारा आहे. नगारखान्याची दुमजली इमारत पुण्यातील पेशवे सरकारने बांधली आहे. या इमारतीची बांधणी दगड कोरून ही वास्तू बनवली आहे. सुंदर महिरप, चौकोन प्रवेशव्दार, दोन्ही बाजूस व्दारावर दिवे ठेवण्यासाठी ३ फुटी स्तंभ, प्रवेशव्दारावर दोन नक्षीचे वर्तुळ, मधोमध गणपतीचे वर्तुळ आहे. वर जाण्यासाठी  दगडी जीना आहे. मध्यभागी रेखीव गणपतीची मुर्ती आहे. पेशवे काळात १८१८ पर्यंत पेशव्यांच्या वतीने देवीसाठी हा नगार झडत होता. पेशव्यांनी एकविरा देवीच्या दिवाबत्तीची पुजेची सोय केली होती. जनार्दन स्वामी प्रित्यर्थ असा शीलालेख या नगार खान्यात आहे. नगारखान्यावर श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्ट मंडळाचे कार्यालय आहे. भक्तांना सुलभतेने रांगेत दर्शन घेण्याकरीता ऊन-पावसापासून बचाव होण्यासाठी आई एकविरा ट्रस्टच्या माध्यमातून पत्र्याची शेड बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे गर्दी वाढली तरी सर्व भक्तांना शिस्तबध्द पध्दतीने आई एकविरेचे दर्शन घेता येते. रांगेतील भक्तांना आईचे दर्शन व नामस्मरण करण्यासाठी ठिकठिकाणी डिजीटल स्क्रीन देवस्थानच्या वतीने लावल्या आहेत. नगारखान्याच्या आत गेल्यावर कार्ला लेण्यांच्या उजव्या अंगाला एक भव्य स्तंभ लागतो. या स्तंभाच्या पायथ्याशी देवीचे वाहन असलेला सिंह आहे. सिंह स्तंभासमोरच म्हणजे लेण्याच्या व्दाराच्या डाव्या अंगाला एका दगडी चबुतऱ्यावर श्री एकविरादेवीचे सुप्रसिध्द मंदिर आहे. एकविरेच्या मंदिरा समोरच्या बाजूस ‘बाबाजी पादुका समाधी’  आहे.  ही समाधी दगड रचून बनवली आहे. चारपदरी दगडी छप्पर असलेली प्राचीन समाधी आहे. त्यात बाबाजींच्या पादुका आहेत. भाविक त्यांचे दर्शन घेतात. बाबाजींच्या समाधी समोर कोरीव दगडांच्या ५ थरात ७.८ फुट इंचाचा एक स्तंभ आहे. स्तंभाचा खालचा चौरस चौथरा ४ बाय ४  फूट आहे . या स्तंभाबद्दलचा कुठलाच पुराव सध्या उपलब्ध नाही. त्याच्या समोर डोंगराच्या कडेला एका चवथऱ्यावर मानी देण्याचे स्थान आहे, आईला प्रसाद येथे ठेवला जातो.

आई एकविरेचे मंदिर डोंगरात असल्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा घालता येत नाही. स्तूपाच्या बाजूला एका लहानश्या गुहेत तांदळा दगडात आईची स्वयंभू मूर्ती आहे तिकडे मंदिर बांधण्यात आले. मंदिरावरील एका शिलालेखात इ.स. १७८८ साली मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने जिर्णोध्दार केला असल्याचा पुरावा मिळतो. तसेच मंदिर प्रवेशव्दाराच्या लोखंडी कमानीवर एका घंटेवर इ.स. १८५७ साल असल्याचे दिसते. ही अक्षरे इंग्रजीत कोरलेली आहेत.

मंदिरात प्रवेश करताना नाण्यांनी भरलेला उंबरठा व दरवाजा दिसतो . दर्शनास आलेल्या भाविकांनी श्रध्दे पोटी हि नाणी लावली आहेत. यातील काही चांदिची नाणी काढून देवस्थांनाने गाभाऱ्यातील दगडावर सुंदर नक्षी काम करून चांदीचा पत्रा बसवला आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम नजरेस पडणारा आईचा चांदीचा नक्षीदार गाभारा ते नयन रम्य नक्षी काम पाहून व आईचे रूप पाहून भाविक आपली सारी दु:ख विसरून जातात. २००२ साली एका भाविकाने ५ किलो सोन्याचा हार व मुकुट आईला अर्पण केला. तसेच अनेक भाविकांनी आईला चांदीसोन्यापासून बनवलेले अनेक अलंकार अर्पण केले आहेत. त्यात हार, मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, नथ, अगंठी, पैंजण व निरजंन, ताट-वाटी, पेला, घंटी, ताम्हण, दिवा, फुल अश्या अनेक प्रकारच्या वस्तू भक्त आई एकविरेला अर्पण करतात. आईची प्रचिती भक्तांना नेहमीच येते. एकंदरीत आजच्या धकाधकीच्या काळात, थकवा, दु:ख, विसरून जाण्यासाठी, पुन्हा नवीन उमेद जागवण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्गतील सौंदर्याने आलेल्या भक्तगणांचे मन प्रफूलीत होवून जाते.