चैत्र महिन्यातील यात्रा

चैत्र महिन्यात पौणिमेस चित्रा नक्षत्र चंद्राजवळ येते. चैत्र शुध्द सप्तमीस प्रारंभ झालेली भव्य जत्रा पोर्णिमेपर्यंत चालते. चैत्र शुध्द षष्ठी आणि सप्तमी. एकविरेच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव तीन दिवस खुप मोठ्या उत्सवात पार पडतो. कार्ला गडावर आईची यात्रा आईचा उत्सव पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरेप्रमाणेच आज हि तितक्याच श्रध्देने भक्ती-भावाने साजरा केला जातो. ट्रस्टच्या वतीने मंदिरात तीन दिवस धार्मिक कार्यक्रम राबिवले जातात. आईचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण देश–परदेशातून तीन दिवस कार्ला गडावर येतात. तीन दिवस साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व आहे.

चैत्र शुध्द षष्ठी

चैत्र महिन्यात भरणारी यात्रा मोठी असते. चैत्र शुध्द षष्ठीस प्रारंभ झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत असते. एकविरा        देवीच्या यात्रेचा समारंभ तीन दिवस साजरा करण्यात येतो. श्री एकविरा आईचा भाऊ भैरवनाथ निवास करत असलेल्या म्हणजेच एकविरा आईचं माहेर समजल्या जाणाऱ्या ‘देवघर ‘ (माहेरघर) या गावात भाविक मोठ्या संख्येने भैरवनाथाच्या पालखीसाठी सज्ज होतात. भैरवनाथाचा मानकरी पाटील व पुजारी हे देवीचा कौल घेवून पालखीसाठी परवानगी मिळवतात.  कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सर्व भक्तांच्यावतीने आराधना करतात आणि पालखीला सुरुवात होते.  देवळासमोरच असलेल्या तलावाभोवती फेऱ्या घालून पालखी नाचवली जाते.  भक्तगण आईच्या व भैरवनाथाच्या जयघोषात स्वत:ला विसरून जातात.  एकविरा आईच्या आणि भैरवनाथाच्या गजरात गुलाल उधळत भक्तीमय वातावरणात या सगळ्यांचा अनुभव घेत मध्यरात्रीपर्यंत पालखी नाचवली जाते.  त्यानंतर पालखी पुन्हा देवळात स्थानापन्न होते.  षष्ठीस निघणाऱ्या या भैरवनाथाच्या पालखीस एकविरा आईच्या पालखी इतकेच महत्व आहे. जुने जाणते आईचे भाविक प्रथम भैरवनाचे दर्शन घेऊनच नंतर आई एकविरेच्या दर्शनाला  कार्ला गडावर येतात.
चैत्र शुध्द सप्तमी 

चैत्र शुध्द सप्तमीस संध्याकाळी श्री एकविरा आईची पालखी काढण्याच्यी तयारी सुरू होते. आई एकविरेच्या पालखी निमिताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पालखीत सामील होण्यासाठी आप-आपल्या गावातून पालख्या घेऊन मोठ्या संख्येने कार्ल्याला येतात. शेकडो मैलाचा पाई प्रवास करीत भाविक आईच्या पालखीत सामील होण्यासाठी आईच्या आठवणीने कार्लाच्या दिशेने येतात. कसलीही परवा न करता आईचे नामस्मरण करीत, आनंदात उत्साहात,  ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, वाजत-गाजत-नाचत गडावर येऊन आईच्या पालखीत सामील होतात. पालखीच्या दर्शनासाठी जगभरातून लाखोच्यां संख्येने भाविक कार्ल्याला येतात. फुलांनी सजविलेल्या पालखीत देवीचा मुखवटा ठेवून पालखी वाजत गाजत निघते. मानकरी भावीक देवीचे भोई होतात. आतषबाजी. गुलाल आईच्या जयजयकाराच्या जल्लोषात देवीची पालखी प्रवेशव्दार ओलांडून पायऱ्या ऊतरू लागते आणि पायथ्याशी वेहेरे गावात येते. प्रवेशव्दारापासून लेण्यांच्या प्रवेशव्दारापर्यंत वाजत गाजत मिरवणाऱ्या पालखीच्या जल्लोषात भक्त आईच्या पायाशी एकरूप होतात. वेहेरेगावाभोवती फेरी मारून परत पालखी पायऱ्या चढुन कार्ला गडावर आणतात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात भाविक आईच्या तेजोमय रूपाचे दर्शन घेऊन गडावरच थांबतात. चैत्र शुध्द सप्तमीच्या रात्री पालखी सोहळा संपन्न झाल्यावर जमलेले भक्तगण थकवा घालवण्यासाठी मंदीर परिसरातच आपलं थांड मांडतात. आत मंदीरात जवळ जवळ पहाटेच्या ४ च्या सुमारास आईच्या “तेलवण्याच्या“ व “मानाच्या“ विधीला सुरुवात होते. कार्यक्रमाला चौल आग्रवाचे “आग्रावकर“ आणि पेणचे “वालाकर“ या मानकऱ्यांच्या हस्ते तेलवण्याचा व मानाचा विधी पार पडतो. प्रथम आईची नणंद जोगेश्वरी आईचा अभिषेक केला जातो. नंतर एकविरा आईचा तेलाने अभिषेक केला जातो. यास तेलवणे असे म्हणतात. या दिवशी तेलवण्याच्या विधीला विशेष महत्व आहे. आईचा आभिषेक सुरू असताना गाभाऱ्यात बसुन कोळी महिला आई एकविरेची पारंपारिक गाणी बोलतात आणि त्याप्रमाणे आईचा विधी केले जातात. देवीचे ओटी भरतात देवीला आरती करतात. कोळी महिलांच्या पारंपारिक गाण्याने मंदीरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. अभिषेक पुर्ण झाल्यावर आईला सजवले जाते नंतर आईची घंटा, टाळ, मृदुंग, ढोलकी व चौघड्यांच्या जल्लोषात आईची आरती केली जाते. त्या नंतर आलेले भाविक आईचं दर्शन घेतात.

चैत्र शुध्द अष्टमी

अष्टमीचा दिवस मानाचा बलिदानाचा दिवस होय. या दिवशी भक्त नवस पुर्ण करण्यासाठी येथे जमतात. नवसात ठरल्याप्रमाणे कोंबडा, बोकड किंवा मेंढा यांपैकी बळी दिला जातो. देवीला प्रसाद म्हणून तीरापणी देवीसमोर ठेवली जाते. (तीरापणी) कोंबडा, बकरा किंवा मेंढ्याची काळजी भाजून विड्यावर ठेवून देवीला प्रसाद दाखवला जातो. त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी लहान मुलांचे जावळ (केस काढणे) केले जातात. मुल होण्यासाठी भाविक नवस बोलतात नवस पुर्ण झाल्याकारणाने लहान मुलांचे जावळ इथे केला जातो. लहान मुलाला वाजत गाजत आईच्या दर्शनाला आणतात त्याच्या गळ्यात हार व कपाळावर आईचा कुंकु लावतात. मंदिराच्या शेजारी बायांचे स्थान आहे तेथे त्या मुलाला दर्शन देतात. नंतर मंदिराच्या बाहेर त्याचे केस काढतात व काढलेले केस गडाच्या मागच्या बाजूस विहीरीत विसर्जन करतात अश्या पध्दतीने आई एकविरेची चैत्र यात्रा सोहळा संपंन्न होतो.

काठीची यात्रा

चैत्रातील यात्रेनंतर आठ दिवसानी पौर्णिमेच्या दिवशी कार्ल्यास भरण्याऱ्या यात्रेस ‘काठीची यात्रा’ म्हणतात. देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या गावातून देवीची काठी  वाजत-गाजत कार्ला गडावर आणली जाते. या यात्रेला स्थानिक आणि परिसरातील गावांतील भक्त आवर्जून उपस्थित राहतात. आईच्या मंदीरासमोर काठी उभी करून सर्व भाविक आई एकविरेचे दर्शन घेतात.