अश्विन नवरात्रौत्सव

श्री एकविरा आई मंदिरात अश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्री उत्सव चालतो. पृथ्वीची प्रतीकात्मक पूजा म्हणून घटस्थापना केली जाते. नऊ प्रकारची धान्य पेरून उगवली जातात. सृष्टीच्या सृजन शक्तीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवातील प्रत्येक दिवसाचे एक महत्व आहे. ट्रस्टच्या माध्यमातून नऊ दिवस मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. दुर्गा स्तोत्र पठण, भजन, जागरण, किर्तन, प्रवचन, शिबीर, आईचा अभिषेक व इतर या दरम्यान यात्रेच्या निमित्ताने अनेक राजकिय नेते, सामाजिक नेते, कलाकार आईच्या दर्शनासाठी न चुकता कार्ला गडावर येतात. मंदिरात नऊ दिवस चौघडा झडतो, नगारा वाजविला जातो. घंटा नादाच्या तालावर पंचारती होते.    नवमीच्या मध्यरात्री होम हवन होते. या होमाला ‘नवचंडी होम’ म्हणतात. या होमाला विशेष महत्व आहे. होमाचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक गडावर येतात. आईचं दर्शन घेऊन नंतर रांगेत उभ राहुन होमाचे दर्शन घेऊनं होमातील राख कपाळी लावून होमात नारळ, कोल्हा (भोपळा), लाकुड, कारवी, फळं, अगरबत्ती, कापूर, लिंबू अर्पण करतात. होम सुरू असतानाच पहाटे शेवटी बोकडं बळी दिला जातो. त्याच्या (काळजीची) तिरापणि करून सर्व भक्तांना त्याचा प्रसाद वाटला जातो.

दशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा सण भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. मंदिरात झेंडू व आंब्याच्या पानांची तोरणं बनवून पुर्ण मंदिराभोवती लावतात. देवीच्या चरणी आपट्याची पाने, झेंडूची फुलं वाहुन सर्व भक्तगण सोनं लुटतात. दसऱ्याच्या निमित्ताने भक्त दानधर्म करतात.