पुराण आणि पुस्तकातील कथा

महाराष्ट्रात आदिमातेची साडेतीन पिठे धार्मिक दृष्ट्या महत्वाची मानली जातात. देवीच्या एका स्तोत्रात या साडेतीन पीठांचा उल्लेख आहे  ती पुढील प्रमाणे,

एक पीठ ते तुळजापूर | व्दितीय पीठ ते माहूर  |
तृतीय पीठ कोल्हापूर | अर्धपीठ सप्तशृंगी ||

१)      रेणुका व एकविरा या देवींचा उल्लेख स्थानपोथीत आढळतो. यादव काळात पैठण या ठिकाणी रेणुकेचे पुर्वी एकस्थान होते. परंतु ते मंदिर ईस्लामी आक्रमकांनी उदध्वस्त केलं.

२)      रेणुकेला यमाई असेही महाराष्ट्रात म्हणतात, यमाई हे नाव यल्लमापासूनच आले असावे.

३)      पर्वतमाथ्यावर काही देवतांची स्थाने आहेत म्हणून त्या देवतांना पर्वतीय देवता म्हणुन संबोधले जाते.

४)      काही देवतांचे जन्म सामान्य माणसाप्रमाणेच झालेला असून त्यांनी केलेल्या अतिमानवी चमत्कारामुळेच त्यांना देवता स्वरूप प्राप्त झालं, रेणुका आपल्या चारित्र्यामुळे विशेषत: तिच्याच पुत्राने शिर उडविले आणि साधून दिले या कारणाने अव्दितीय ठरली. शिवाय एका युगपुरूषाची माता म्हणून समाजाने तिला देवतास्थानी बसविले.

५)      एकविरा देवी श्लोक

एकविरेती विख्याता सर्वकामप्रदायिनी,
अदितिर्यामदंबा सा संभविष्याति भूतले,
जनिष्यामि न संदेह पंचपुत्रान्मनोरथान्  
- सह्याद्रियखंड

अदितीने तप केल्यावर शंकरानी तिला वर दिला की तुझा अवतार भूतलावर ईक्ष्वाकू वंशातील रेणुराजाच्या घरी होईल. त्यावेळी तुझे मुळ नाव रेणुका असेल. परंतु भूतलावर मात्र तू एकविरा या नावाने विख्यात होशील. तसेच तुला पाच पुत्र होतील म्हणून या श्लोकाधारे असे म्हणता येईल की या देवीला एकविरा हे नाव भगवान शंकरानींच देऊन ठेवले आहे.

रेणु+का  = रेणुमयी  = पुथ्वी रेणुका ही भुदेवी आहे. तिचे रेणुका हे नाव पृथ्वीवाचक आहे. पृथ्वी रेणुकेचे माहात्म्य आदितीचा अवतार मानते. आदिती ही पृथ्वी असल्याचे वैदिक ऋषींची धारणा आहे.

देवी शब्दाचा अर्थ – देवी शब्दचा अर्थ स्त्रीदेवता किंवा देवपत्नी असा होतो. शिवपत्नी पार्वती हिलाच देवी हे नाव मिळाले. सर्वश्रेष्ठ देवता आदिमाता, जगदंबा असे अनेक निरनिराळी नावे उल्लेखली आहेत.

एकशेआठ शक्तीपीठे – तसे सांगतांना ५१ शक्तीपीठे म्हणून सांगितले जाते. एकशेआठ शक्तीपीठांमध्ये वसतीस्थान आई एकविरेचे स्थान सह्याद्रि पर्वतात ४१व्या क्रमांकावर आहे.

इंद्रायणी नदीच्या भव्य खोऱ्यात पाचशे फुट उंचावर डोंगरात देवीचे स्थान आहे, हा डोंगर कार्ला या नावाने परिचित आहे, कार्ला हे नाव तेथील प्राचीन ऐतिहासिक शिल्प लेण्यांमुळे पडले आहे.

उत्पती अख्यायिका

एकदा रेणुका मलप्रभा नदीवर पाणी आणण्यास गेली असता. त्याचवेळी त्या नदीवर चित्ररथ गंधर्वाचे प्रणयचाळे तिच्या दृष्टीस पटले. तेव्हा रेणुकेचे मनं विचलीत झाले. मनोनिग्रेही तपाचरणी तारसीला ते योग्य नव्हते. आश्रमामध्ये योगसाधना करीत असलेल्या जमदग्निला ऋषींना अंतर्ज्ञानाने पत्नीची ही मन स्थिती कळून चुकली आणि पतिव्रत्य भंगाचे शासन म्हणून त्यांनी परशुरामाला तिचा वध करण्याची आज्ञा केली.

एकविरा आईची इतर मंदिरे

हिरवेगावातील एकविरा – पुष्पगंगेच्या काठी हिरवे गावाजवळ तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे आई एकविरा देवीचे मंदिर आहे.

गुहागर येथेही आई एकविरेचे मंदिर आहे.

किन्हई येथेही आई एकविरेचे मंदिर आहे.

उरण तालुक्यात वेश्वी गावानजीकच्या डोगंरावर श्री एकविरेचे मंदिर आहे.

पनवेल मध्ये चिरनेर जवळ मोजे कळंबुसरे गावात इंद्रायणी डोंगरावर एकविरा आईचे नवीन मंदिर आहे.

ठाणे जिल्हात बाळकूम गावाजवळ ढोकाळी गावाच्या नाक्यावर नविन प्रशस्त एकविरा आईच्या भक्तांनी बांधले आहे.

आगाशी जवळ अरनाळे येथे श्री रेणुका देवीचे मंदिर आहे, हे मंदीर स्वत: परशुरामाने बांधले आहे.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी एकविरा देवी व रेणुका देवीची मंदिर आहेत. तसेच हल्ली भक्तगण आप-आपल्या गावात ही आईचे नवे मंदिर बांधत आहेत. कारण आईचे रोजच्या रोज दर्शन घेता यावे म्हणून बांधत आहेत.

कर्नाटक राज्यातही एकविरेचे व रेणुकेचे मंदिर आढळते.

श्री परशुराम मंदिर व माहिती

श्री परशुराम विष्णुचा सहावा अवतार होता व परशुराम कोकणचा संस्थापक. म्हणून कोकणातच चिपळून जवळ १००० फुट उंच डोंगरावर परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील घाटावर ब्रह्मदेव, डावीकडे शंकर अशा मुर्ती आहेत. मागे पितळी प्रभावळ असून परशुरामाच्या मुर्तीसमोर सिंहासन आहे. त्याकाली स्वयंभू स्थान आहे. या स्थानकावरील पादूकांची पूजा केली जाते. समुद्रास रोखून सप्त कोकणची निर्मीती केली म्हणून परशुरामाला कोकणचा दैवता मानतात.

वैशाख शुध्द प्रतिपदा, अक्षय तृतीया, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते. यामंदीरा शेजारी एक तलाव आहे. परशुरामाने ५ बाण मारून पाणीवर आणल्याची अख्यायिका आहे.